नवी मुंबई - वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजी फळे यांची आवक झाली आहे. बाजारात तब्बल दीड हजार गाड्या दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. गर्दी आवरता-आवरता बाजार समिती प्रशासनाच्या चांगलेच नाकी नऊ आले आहेत. तोबा गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराचा धोका वाढला आहे.
आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर 1 ते दीड हजार गाड्यांची आवक झाली आहे. राज्यभरातून एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला दाखल झाला आहे. त्यामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. बाजार समिती आवारात टप्प्या-टप्प्याने 100 गाड्या सोडण्यात येत आहेत. तरीही, ही गर्दी आवरता-आवरता बाजार समिती प्रशासनाला चांगलाच घाम फुटला आहे. बाजारपेठेत ग्राहक कमी व आवक जास्त यामुळे भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत. शिवाय, ग्राहक एकमेकांत अंतर न ठेवता गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडाला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी सुरू आहे. दुसरीकडे बाजारपेठेत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतकी गर्दी होणे, अत्यंत धोकादायक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बॅरिकेडसही लावण्यात येत आहेत. मात्र, तरीही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे दररोज फक्त 30 टक्के व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसी बाजार समितीला गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय, नवी मुंबईत येणाऱ्या 4 महामार्गावर चेकपोस्ट बसवण्याचे व एकावेळी फक्त 200 गाड्याच एपीएमसीमध्ये पाठवण्याचे तसेच, सर्व गाड्या महामार्गावरच उभ्या करून ठेवण्याचे आदेशही आयुक्त मिसाळ यांनी बाजार समितीला दिले आहेत.