ठाणे - दुबईहून परतलेल्या तरुणाला कोरोनाची लागण असल्याच्या संशयातून रहिवाशांकडून मानसिक त्रास दिल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. यातही संतापजनक बाब म्हणजे महापालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या या तरुणाला इतर रुग्णांसोबत रांगेत उभे करण्यात आले. यातून कोरोनाबाधित रुग्णाविषयी कल्याण डोंबिवली महापालिका अद्यापही गंभीर नसल्याचे दिसत आहे.
कल्याण पश्चिमेत राहणारा एक तरुण काल दुबई येथून कल्याणमध्ये परतला आहे. विशेष म्हणजे त्याची मुंबई विमानतळावर सर्व तपासणी झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची लागण नसल्याचे निश्चित झाल्यावर घरी पाठविण्यात आले. परंतु, घरी परतल्यानंतर तरुणाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी तू १४ दिवस घरात एकटाच रहा. बाहेर निघू नको, असे सांगत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेमुळे त्या तरुणाला मानसिक धक्का बसला आहे.
या प्रकारानंतर रहिवाशांचा संशय आणि तरुणाच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा तरुण केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात गेला. त्या तरुणाबाबतची सर्व माहिती डॉक्टरांना सांगितल्यानंतरही त्याला अस्युलेटेड वार्डात न पाठवता इतर रुग्णांसोबत केसपेपर काढण्यासाठी रांगेत उभे रहाण्यास सांगण्यात आले. इतकेच नाही तर, इतर रुग्णांसोबतच त्याला वावरावे लागले. केडीएमसी प्रशासनाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नक्की काय दक्षता घेतली, यावरून दिसून येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केडीएमसी आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी कोरोना बाबत महापालिकेच्या आरोग्य विभागासह रुख्मिणी बाई रुग्णालय सज्ज असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. मात्र तो दावा फोल ठरल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. आता आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : बंजारा समाजाची काशी मानलेल्या पोहरादेवी येथील राम नवमीची यात्रा रद्द
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : फुकट घ्या फुकट, कोंबड्या फुकट; मिरजेत चक्क कोंबड्या वाटल्या मोफत