ठाणे - घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले आहेत. याविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भात लावण्यात आलेल्या एका फलकाखालीच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे व जावेद फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गॅस दर वाढीचा निषेध म्हणून रिकामे सिलिंडर तिरडीवर ठेवत प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. तसेच हातगाडीवर दुचाकी ठेवत यावेळी राष्ट्रवादीने पेट्रोल दरवाढीचा निषेध केला.
'केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची फसवणूक'
केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून, वेळोवेळी इंधन दरवाढ करत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. म्हणूनच आम्ही आज केंद्र सरकारकडून लावण्यात आलेल्या फसव्या योजनांची माहिती देणाऱ्या बॅनरखाली आंदोलन केले आहे. इंधन दरवाढ कमी न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिला आहे.