ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय हे आता रुग्णांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. कारण येथे आलेला रुग्ण हा सुखरूप घरी परतल्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. या रुग्णालयात 48 तासांत तब्बल 18 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी रुग्णालय प्रशासन आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे रुग्णालय प्रशासन मात्र अपुरे डॉक्टर आणि स्टाफची संख्या याला कारणीभूत धरत आहेत. थोडक्यात काय मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच नागरिकांना कोणी वालीच उरला नसल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोप आता विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
सर्वच नेत्यांनी केली प्रशासनावर टीका : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार दिघे, मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयाला भेट देऊन येथील डीन व डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. परंतु, पालिका प्रशासनच या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तर डॉक्टर आणि स्टाफ अपूर्ण संख्यबळ असल्याने, असे प्रकार भविष्यात देखील घडतीलच असे एकंदरीत चित्र आता तरी दिसत आहे.
सर्व प्रकारची होणार चौकशी : आयुक्त आरोग्य सेवामार्फत चौकशी समिती गठीत केली असून, या चौकशी समितीमध्ये ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे पालिका आयुक्त, संचालक आरोग्य सेवा, जे जे रुग्णालयाचे नामांकित डॉक्टर यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
कळवा रुग्णालयात 48 तासांत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आयुक्तांनी आणि पालकमंत्री यांनी येथे येणे गरजेचे होते. रुग्णालय प्रशासन बेशरम आहे. कोणाला जबाबदारीची जाणीव नाही. लोकांच्या मृत्यूची खंत नसलेले बेशरम माणसे आहेत. यांच्या भावना मेलेल्या आहेत. 18 रुग्णांचा मृत्यू म्हणजे ही न पटणारी बाब आहे. तर ठाणे महापालिकेने मृत्यू रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रूपये द्यावे. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
48 तासात तब्बल 18 मृत्यू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच ठाण्याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला म्हणून सर्व ठाणेकर सुखावले होते. आता ठाण्यातील सर्व प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागून चांगली आरोग्य सुविधा प्राप्त होईल असे ठाणेकरांना वाटले. परंतु, त्यांच्या या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. आपल्याला काय आरोग्य सुविधा मिळत आहेत याचे चित्र कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. गुरुवारी या रुग्णालयात पाच जणांना आपला जीव गमाव लागला होता. त्यानंतर गेल्या 48 तासात तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्यांने नागरिक हादरले आहेत.
कळवा रुग्णालयात 48 तासांत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासन मात्र अपुरे डॉक्टर आणि स्टाफची संख्या ही कारणे देत असले तरी, अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिकारी यांची गैरप्रकारे झालेली नेमणूक या घटनेला कारणीभूत आहे. यामध्ये आयुक्तांनी आणि नॅशनल मेडिकल कौन्सिल यांनी हस्तक्षेप करणे गरजचे आहे. - अविनाश जाधव, नेते, मनसे
रुग्णालयाचा सर्व कारभार स्थलांतरित : ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातून अनेक रुग्णांना ठाण्याचे सिविल हॉस्पिटल आणि कळव्याचे छत्रपती शिवाजी रुग्णालय यांचा आसरा असतो. त्यातील सिविल रुग्णालयाचे नवीन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होणार असल्याने, जुन्या रुग्णालयाचा सर्व कारभार मेंटल हॉस्पिटल जवळ स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यातच कळवा रुग्णालयात सतत होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळे स्मार्ट सिटीचा फुगा फुटला आहे. एकूण पाचशे रुग्णांची क्षमता असलेल्या रुग्णालयात 600 च्या वर रुग्ण दाखल असून रुग्णांना चक्क जमिनीवर झोपावे लागत आहे.
नातेवाईकांनी केल्या तक्रारी : आयसीयूमध्ये देखील कोणतीही जागा उपलब्ध नसलेल्या रुग्णांकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने हे प्रकार घडत असल्याचे, हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. परंतु ही समस्या गेले कित्येक वर्ष तशीच असल्याने यावर आधी तोडगा का काढला नाही? असा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत. रुग्ण स्वतःच्याच मलमूत्र मध्ये तासनतास पडून असले तरी ते साफ करण्यास कोणी येत नाही अशी तक्रार देखील नातेवाईकांनी केली. सगळ्या टेस्ट व औषधांसाठी बाहेर जावे लागते, अशी तक्रार देखील नातेवाईकांनी केली.
हेही वाचा -