ठाणे- शहरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नौदलातील निवृत्त झालेल्या ५० वर्षीय अधिकाऱ्याचा १०० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना बदलापुरातील साई आर्केड या इमारतीत घडली. गुड्डूसिंह यादव असे मृत नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे.
खळबळजनक बाब म्हणजे, या घटनेनंतर मृत गुड्डूसिंहची पत्नी घरातून निघून गेल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत गूढ वाढले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर पश्चिम भागातील खामकर विद्यालयाजवळ असलेल्या साई आर्केड या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत गुड्डूसिंह यादव यांचा एक फ्लॅट आहे. यादव हे नौदलातून निवृत्त झाले असून ते दिल्ली येथे राहत होते. मात्र, बदलापूरमधील आपला फ्लॅट विकण्यासाठी ते तीन दिवसापूर्वीच आपल्या पत्नीसह बदलापूरला आले होते.
शनिवारी रात्री दीड वाजता अचानक साई आर्केडच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून धूर येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला संपर्क केला. पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व गुड्डूसिंह यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आगीमुळे घरातील फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले होते. आगीत गुड्डूसिंह यादव शंभर टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
धक्कादायक बाब म्हणजे, एवढी भयंकर घटना घडली असतांना गुड्डूसिंह यांची पत्नी मात्र घरातून निघून गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, गुड्डूसिंह यांच्या पत्नीशी संपर्क झाल्यानंतरच या घटनेचे सत्य समोर येणार आहे. त्याचबरोबर, ही आत्महत्या आहे की हत्या ? याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- तब्बल २५ वर्षांतर दादोजी कोंडदेव मैदानात रंगला सामना, दिलीप वेंगसरकर यांनी केली नाणेफेक