नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयार झाले आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये मात्र धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेकडे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्त जागांची मागणी केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सद्यस्थितीत बिघाडी दिसून येत आहे.
अधिक जागा देण्यास शिवसेनेचा नकार -
पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागा तर काँग्रेसने 32 जागांची मागणी केली आहे त्यांना अधिक जागा देण्यास शिवसेना स्पष्ट नकार देत आहे. तसेच शिवसेना 70 जागा मागत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येही आपसात धुसफूस -
काँग्रेसमध्ये अनिल कोशिक, रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी हे काँग्रेसचे तिकीट मागत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपसात धुसफूस सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून स्वतःच्या कुटूंबीयांकरिता तिकीट मागितले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
आमदार शशिकांत शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात संघर्ष -
आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असा संघर्ष राष्ट्रवादीमध्ये नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निदर्शनास येत आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांचा एक गट व जितेंद्र आव्हाड असा दुसरा गट नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट सक्रिय असल्यामुळे कार्यकर्त्यांनी मनस्थिती द्विधा झाली आहे.
शिवसेनेत देखील विजय चौगुले व विरुद्ध विजय नाहटा संघर्ष -
शिवसेनेमध्ये विजय चौगुले विरुद्ध विजय नाहटा संघर्ष नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संघर्ष दिसून येत आहे.