ठाणे - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहलेल्या पुस्तकाचे आज दिल्लीत प्रकाशन झाले. यामध्ये नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची होळी केली आहे.
हेही वाचा - 'जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवाजी महाराज होणे नाही, ह्यांचं डोकं फिरलयं'
या पुस्तकावरुन भाजपवर जोरदार टीका होत आहे. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असताना बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ इंटरनेटवरून काढून त्याची होळी केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करणारे भाजप नेते भगवान गोयल यांच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ती घोडचूक भाजपने केली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस धडा शिकवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली आहे.