ठाणे - ठाण्याचा राजा म्हणून ओळख प्रस्थापित असलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
वैविध्यपूर्ण देखावा आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली 40 वर्षे अखंडीतपणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सामाजिक उपक्रमही या मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असतात. मात्र, सध्या कोरोना महामारीचा काळ सुरु आहे. या काळात भाविकांची गर्दी झाली तर फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच यंदाचा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये घेण्यात आला.
दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून या गणेशोत्सवामध्ये माझा सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव माझ्यासाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे. मात्र, सध्याच्या महामारीच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव सार्वत्रिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय माझ्यासह नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी अत्यंत वेदनादायक आहे. मात्र, पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि थाटामाटात हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले आहे.
ठाण्यात दहीहंडीची सुरूवात झाल्यापासून त्याला ग्लॅमर जितेंद्र आव्हाड यांनी दिले. मात्र, या नरवीर तानाजी मंडळाची मूळ सुरूवात जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यानंतर हे मंडळ ठाण्याचा राजा म्हणून ओळखले जाऊ लागले. या ठिकाणी उभारण्यात येणारा देखावा हा सामाजिक संदेश देणारा असल्यामुळे या मंडळाने खूप नावलौकिक मिळवला होता. राज्यातील आणि देशातील अनेक नेते सुरूवातीपासून या मंडळाला हजेरी लावत असतात.