ठाणे - भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई-मनमाड डिझेल पेट्रोल वाहिनीतून डिझेल चोरी करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये एका पेट्रोलपंप मालकाचा समावेश आहे.
पेट्रोल पंप मालक शिवशंकर राम केदार दुबे, सलीम शेख, विष्णू गणपत गायकवाड, नितीन उर्फ महेश नागनाथ तानवडे, शशिकांत राजे यादव, शशिकांत वसंत रुपनार असे आरोपींचे नावे आहेत.
मुंबईला जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई मनमाड डिझेल पेट्रोल वाहिनीला तालुक्यातील ओवळी गावाजवळ पंजाब ढाबा येथे पाईपलाईनला छिद्र पाडले होते. गेल्या २३ मार्चला तस्करांनी त्यामधून टँकरद्वारे डिझेलच्या चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, पेट्रोल पंप कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने डिझेल चोरीचा प्रकार हाणून पाडला. त्यावेळी घटनास्थळावरून १४ लाख ४० हजार रुपयांचे ८ हजार लिटर डिझेल आणि १० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले होते.
पुढील तपास करून डिझेल तस्करांचा पर्दाफाश करण्यात आला. या टोळीतील आणखी ६ जणांना अटक केल्याने या गुन्ह्यातील तस्करांची संख्या दहावर पोहोचली आहे. अटकेत असलेले टोळी गेल्या कित्येक दिवसांपासून सोलापूर भागात डिझेल-पेट्रोल विक्री करीत असल्याची माहिती तपास अधिकारी रवींद्र वाणी यांनी दिली आहे.