ठाणे - हे सरकार टेंपररी आहे, आम्ही पुन्हा सत्तेवर येणारच! असे भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. या सरकारला काही जमत नाही. राज्याचे प्रशासन, राज्याची डेव्हलपमेट यांना माहिती नाही. यांना मंत्रीमंडळ तयार करायला सव्वा महिना लागला, यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लावला आहे.
मंत्रीमंडळात खरे शिवसैनिक फक्त चार, बाकी सर्व आयात केलेले..
शिवसेनेला मराठी माणसांबद्दल खरेच काही वाटत असेल, तर त्यांच्या मंत्रीमंडळाने मराठी माणसांसाठी घेतलेला एकतरी निर्णय दाखवावा. या मंत्रीमंडळात, ज्यांनी सेनेसाठी कष्ट केले असे खरेखुरे शिवसैनिक केवळ दोन मंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना पकडून चार. बाकी सर्व उपरे घेतलेले, त्यांना कोणीही विचारत नाही. जर महाराष्ट्राचे राज्यकर्ते असे असतील, तर जनतेने कोणाकडे पहावे? असा टोला त्यांनी सेनेला लावला आहे.
कर्जमाफीची अंमलबजावणी नाही तर केवळ घोषणा..
या सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करत, कॅबिनेटमध्ये जीआर काढला आहे. मात्र, या जीआरवर कर्जमाफी होणार कधी याबाबत कोणत्याही तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे ही कर्जमाफी कधी मिळेल हे सांगताच येत नाही. म्हणूनच जीआर काढला म्हणजे काय या सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी केली, असे नाही. त्यांनी कर्जमाफीची केवळ घोषणाच केली आहे, असे राणे म्हणाले.
भाजपला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही..
युती करण्यासाठी भाजप कोणाकडे गेले नव्हते, तर शिवसेनाच आली होती. भाजप सध्या केंद्रात सत्तेत आहे. महाराष्ट्रातही आमचे 105 आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. असे म्हणत, शिवसेनेकडे असलेल्या 54 आमदारांपैकी 35 नाराज असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. नेमके कोणते नेते नाराज आहेत, याबाबत विचारले असता, राणेनी 'तुम्ही यादी शोधा, माझ्याकडे यादी नाहीये..' अशा शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले.
या सरकारकडून काही अपेक्षाच नाहीत..
हे सरकार कामाच्या बाबतीत गंभीर नाही. त्यांना प्रशासनाची, राज्याच्या विकासाची काही माहिती नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाहीत, त्यांच्याकडून मी काय अपेक्षा ठेवणार, असे राणे म्हटले.
आदित्य ठाकरेंनी आधी मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडावी..
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आदित्य ठाकरेंनी केलेल्या ट्विटबाबत विचारले असता, त्यांनी भाजपला काही शिकवण्याची गरज नाही. भाजपमध्ये सर्व शिकलेले लोक आहेत. आम्हाला कायदा काय आहे हे माहिती आहे. आदित्य ठाकरेंनी त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाची जबाबदारी आधी पार पाडावी, नंतर भाजपबद्दल बोलावे असे ते म्हणाले.
तर मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील बैठकीदरम्यान सुरू असलेल्या मेसेज प्रकरणाबाबत बोलताना राणे म्हणाले, की त्यांना कामाचे गांभीर्यच नाही. बैठकीमध्ये काही योजना जाहीर व्हायला हवी, तसेच शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने कोणतीही विकासाची चर्चा व्हायला हवी होती, मात्र तसे काही न करता मुख्यमंत्री परत आले, असे म्हणत राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर प्रहार केला.
हेही वाचा : ...अन् मेलेला नेता म्हणून मला नरकात पाठवले - देवेंद्र फडणवीस