ठाणे - अनैतिक संबंधातून पतीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची कुर्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील माळ परिसरातील जांभुळवाडी येथे ही घटना घडली आहे.
याप्रकरणी टोकावडे पोलिसांनी पत्नीच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला गजाआड केले आहे. तर एक आरोपी फरार आहे. नारायण पारधी असे हत्या करणाऱया आरोपीचे नाव आहे. तर हत्या झालेल्या प्रियकराचे नाव भास्कर पारधी आहे. ते दोघेही एकाच गावचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील माळ परिसरातील जांभुळवाडी येथे नारायण आपल्या पत्नीसोबत राहातो. काही महिन्यांपासून त्याच परिसरात राहणाऱ्या भास्कर पारधी याचे नारायणाच्या पत्नीशी प्रेम संबंध निर्माण झाले. याची कुणकुण नारायणला लागताच त्याने भास्करला विरोध करून त्याच्याशी वाद घातला होता. त्यानंतरही अनेक वेळा त्याच कारणावरून दोघामध्ये वाद होत होता. मात्र तरीही भास्कर हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दरम्यान, भास्कर हा शनिवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून थेट नारायणच्या घरी गेला व त्याच्या पत्नीला आवाज देवू लागला. पत्नीचा प्रियकर हा थेट घरी आल्याने पती नारायणची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर नारायणचा साथीदार गोविंद याने भास्करला पाठीमागून मिठी मारून घट्ट धरून ठेवले आणि रागाच्या भरात असलेल्या नारायणने कुऱ्हाडीच्या एका घावातच भास्करची निर्घृण हत्या केली.
या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. आरोपी नारायण याला गावातून अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार गोविंद हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.