ठाणे - कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून पोटच्या मुलानेच वृद्ध आई वडिलांची राहत्या घरातच गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा मांडा परिसरातील एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आरोपी मुलावर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अनमोल भोसले (३७) असे आई वडिलांच्या दुहेरी हत्येप्रकरणी अटक आरोपी मुलाचे नाव आहे. तर अशोक भोसले (७०) व विजया भोसले (६०) असे हत्या झालेल्या आई वडिलांचे नाव आहे.
बहिणीला फोन दिली माहिती अन - कल्याण जवळ टिटवाळा-मांडा येथील पंचवटी चौकातील साई दर्पण इमारतीत मृतक अशोक व त्यांची पत्नी विजया आरोपी मुलगा अनमोल असे कुटुंब राहत आरोपी अनमोलचा विवाह झाला असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. अनमोलने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या बहिणीला आई-वडील मृत झाल्याचे सांगत गुरुवारी (९जून ) रोजी घरी बोलावून घेतले. त्यानंतर अनमोलची बहीण घरी आली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आई-वडिलांचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. शिवाय घरात दुर्गंधीही येत होती तर आरोपी अनमोल दोन्ही मृतदेहांच्या शेजारीच बसला होता. सगळच संशयास्पद वाटल्याने बहिणीने या घटनेची माहिती कल्याण पोलिस ठाण्यात दिली.
आई वडिलांच्या मृतदेहासोबतच होता घरात बसून - गेल्या काही महिन्यापासून कौटुंबिक वादातून आरोपी अनमोल याला नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून अनमोलने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी (८ जून ) रोजी राहत्या घरातच आपल्या आईवडिलांची चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या करून दिवसभर तो दोघांच्या मृतदेहासोबतच होता. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी आपल्या बहिणीला आई-वडील मयत झाल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस तपासात दुहेरी हत्याकांड केल्याचे निष्पन्न - दुहेरी हत्याकांडाची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणमधील महापालिकेच्या रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर पंचानाम करत आई वडिलांचे दुहेरी हत्याकांड मुलगा अनमोलने केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अनमोलला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता. त्यानेच चाकूने आई वडिलांच्या गळ्यावर वार करत या दोघांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करत अनमोल अटक केली आहे.
आरोपी मुलाला १६ जूनपर्यत पोलीस कोठडी - आरोपी मुलाला आज (१० जून ) रोजी दुपारच्या सुमारास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १६ जूनपर्यंत म्हणजे ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी अनमोल हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात देखील राहत होता. त्याने कोळसेवाडी पोलिसांना अनेकदा फोन करून आई वडील पैसे घेतात, असे खोटेनाटे आरोप केले होते. तसेच अनेकदा पोलिसांना फोन करून त्रास दिला. या प्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी अनमोल विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - Women Protest March : नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने