ठाणे: खारघर येथील 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यावेळी मुरबाड तालुक्यातील एका श्री सदस्याला उष्माघाताचा त्रास जाणवला होता. त्यांची बुधवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली; परंतु या दुर्घटनेत जखमी झालेले व आपल्या गावाकडे येऊन उपचारा दरम्यान दगावल्यांची दखल शासन स्तरावर घेतलीच गेली नाही. असाच खळबळजनक प्रकार मुरबाड तालुक्यात समोर आला आहे. रविंद्र चिंधू देशमुख (५०) असे मृत्यू झालेल्या श्रीसदस्याचे नाव आहे.
प्रशासन दरबारी निराशाच: नवी मुंबईतील खारघर येथील सोहळ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातून शेकडो महिला, पुरूष श्री सदस्य गेले होते. दुर्घटनेनंतर ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी तालुक्यातील तळेगाव येथील रविंद्र चिंधू देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी या मृत्यूची नोंद करण्याबाबत मुरबाड तहसिलदारांची भेट घेतली असता त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही.
तहसिलदारांचा अजब तर्क: आता वेळ निघून गेल्याने व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वेळेअभावी नोंद करता येणार नसल्याचेही तहसिलदारांनी सांगितले. असे असंख्य श्री सदस्य मरण पावल्याचा आरोप मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य शाम राऊत यांनी केला. भर उन्हात हा सोहळा केवळ राजकीय फायद्यासाठी घेण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
काय म्हणाले तहसीलदार? या संदर्भात मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांच्याशी संपर्क साधला असता, खारघरला जे जखमी झाले त्यांना तिथेच दाखल करून उपचार दिले गेले; मात्र मुरबाड येथे येऊन दोन दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतलेले किंवा मयत झालेल्यांच्या नोंदी या दुर्घटनेत करता येत नाहीत. त्या घटनेची माहिती तात्काळ शासनाला पुरविली गेली असून आता जखमी झालेले आणि मयत झालेल्यांची नावे या यादीत येऊ शकत नाहीत, असे तहसीलदार आवारी यांनी सांगितले.
चौकशीसाठी समिती घोषित: खारघर येथे मागच्या रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उष्माघाताने १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. यावरून राजकारण तापलं असताना सरकारने आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती घोषित केली आहे. ही समिती एका महिन्याच्या आत या संदर्भात अहवाल सादर करणार आहे.
श्री सेवकांच्या आग्रहास्तव कार्यक्रम दुपारी: मागच्या रविवारी खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत पावलेल्यांचा आकडा वाढत असल्याने सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची उच्च स्तरातून निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची या प्रकरणी चौकशीसाठी नियुक्ती केल्याने विरोधक नाराज झाले आहेत.
हेही वाचा: Dantewada Naxalite Attack Video: दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर, 10 जवान झाले शहीद