ठाणे : मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत एका जागेसाठी संभाव्य भाजप - शिंदे गटाची युती तुटल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अनेक वर्षांची आपली सत्ता अबाधित राखण्यास पुन्हा एकदा शिंदे गटातील माजी आमदार गोटीराम पवार यांना मोठे यश आले आहे. या निवडणुकीत भाजपला अर्थात आमदार किसन कथोरे यांच्या समर्थक उमेदवारांना रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गट व भाजपच्याच दुसऱ्या गटाने हातमिळवणी केल्याचे दिसून आले.
भाजपला केवळ तीन जागा: मुरबाड कृषी बाजार समितीत १७ जागांसाठी प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत सेवा संस्थांच्या ११ जागेसह सर्वच मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. तर ग्रामपंचायत मतदार संघामधील सुरेश बांगर, रमेश उघडा आणि अशोक मोरे हे फक्त ३ भाजपचे उमेदवार निवडून आल्याने, शिंदे गटातील पवारांनी पुन्हा एकदा आपली सहकार क्षेत्रातील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे भाजपच भाजपच्या पराभवाचे कारण असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरु झाली आहे.
भिवंडीत महायुतीला १० जागा तर आघाडीची ८ जागेवर सरशी: भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीची महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप युतीची परिवर्तन पॅनल अशी थेट काटे कि टक्कर झाल्याचे पाहवयास मिळाले आहे. एकूण १८ जागा पैकी १० जागा भाजप शिंदे गटाला मिळाल्या आहे. तर ८ जागा महाविकास आघाडीचे पटकावल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे १० पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघात महायुतीचे ३ उमेदवार विजयी झाले असून महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एका ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेचा निकाल मविआच्या दिशेने लागला. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीची सत्ता स्थापन होऊनही 'गड आला, पण सिंह गेला' अशा प्रतिक्रिया महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या.
महायुतीचे ४ उमेदवार बिनविरोध: विशेष म्हणजे महायुतीचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर १४ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे श्रीराम पाटील, सुरेश कोलपे, ख्वाजा शेख, विकास देसले या चार जणांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तर शनिवारी मोहन म्हणेरा, विष्णू पाटील, ज्ञानेश्वर पवार, सचिन पाटील, मनिष म्हात्रे, सागर देसक या महायुतीच्या १० उमेदवारांना मतदारांचा कौल मिळाला. तर महाविकास आघाडीचे महेंद्र पाटील, अनंता पाटील, शरद पाटील, संजय पाटील, जयनाथ भगत, प्रकाश भोईर, निलम पाटील, मीराबाई गायके या ८ उमेदवारांनी मविआचा गड राखत आगामी निवडणुकांत भाजपा महायुतीला प्रत्युत्तर देत मविआचा किल्ला लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रविवारी शहापूर आणि उल्हासनगर बाजार समितीचा निकाल: दरम्यान उद्या रविवारी शहापूर आणि उल्हासनगर कृषी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होऊन सायंकाळी मतमोजणी होणार आहे. यामध्ये उल्हासनगर बाजार समितीच्या १७ जागासाठी ३३ उमेदवार तर शहापूर बाजार समितीच्या १७ जागेसाठी ४४ उमेदवार रींगणात आहेत. विशेष म्हणजे उल्हासनगर कृषी बाजार समितीमध्ये भाजपाने ५ जागा शिंदे गटाला दिल्या असताना देखील एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढवीत आहेत. तर शहापूर कृषी बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून महविकास आघाडीची मोट बांधून ते मैदानात उतरले आहे. तर भाजप शिंदे गटही तितक्याच ताकतीने शहापूर बाजार समितीवर कब्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे.