ठाणे - दिवा प्रभागसमिती परिसरात कोविड कालावधीत झालेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार दिवा विभागातील कांदळवनात अनधिकृपणे बांधण्यात आलेल्या चाळी व वाणिज्य बांधकामे तोडण्याची कारवाई पोलीस बंदोस्तात नुकतीच करण्यात आली. ही कारवाई उपआयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचेमार्फत करण्यात आली.
मागील आठ ते दहा महिन्यांपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू होते, महापालिकेची संपूर्ण यंत्रण कोविडच्या कामात व्यस्त होती. याचदरम्यान दिवा विभागात अनधिकृत बांधकामे करण्यात आली. काही बांधकामे ही खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात करण्यात आली होती, त्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत होता. याबाबत पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे तक्रार केली होती, कोविडचा प्रभाव कमी झाला असून, महापालिका कार्यक्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा आढावा घेवून त्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार दिवा प्रभागसमिती क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली होती.
सुट्टीत अवैध बांधकामावर आशीर्वाद -
अनधिकृत बांधकामांसंदर्भात जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. याबाबत चौकशी केली असता, प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त जानेवारी महिन्यात वैदयकीय कारणास्तव रजेवर असताना या कामांना दिवा प्रभागसमितीतील कर्मचाऱ्याने परवानगी दिली असल्याची बाब निदर्शनास आली. चौकशअंती लिपीक अमित गडकरी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त महेश यांनी दिली. अनधिकृत बांधकामावर ठोस कारवाई करण्यात येईल व अशा कामांना पाठिंबा देणाऱ्यांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले.