मीरा भाईंदर(ठाणे)- उत्तन परिसरामध्ये सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमणावर मीरा भाईंदर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये अनेक बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. महापालिका उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सरकारी जागेवर अतिक्रमण
मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी सरकारी व खासगी जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. बेकायदा बांधकामे करून शासनाचा महसूल बुडवण्यात येतो, मात्र अनेकवेळा आर्थिक हितसंबंधातून अशा बांधकामाकडे दुर्लक्ष केले जाते.
महापालिकेच्या पथकाला स्थानिकांचा विरोध
दरम्यान आज उत्तन परिसरामध्ये असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून नागरिक जेसीबी व पोकलेनच्या समोर रस्त्यावर झोपले. तर काही लोकांनी सदरील बांधकमावरील कारवाई टाळण्यासाठी त्याठिकाणी लहान मुले व देवी देवतांच्या फोटोचा आधार घेत कारवाईला अटकाव केला. कारवाईला विरोध झाल्याने महापालिकेने ही अतिक्रमणे जमीनदोस्त न करात केवळ बांधकामावर तोडक कारवाई केली.
सरकारी जागेवर बांधकाम
उत्तन परिसरातील पाली चौक गावाच्या बाजूला रस्त्यालगत सरकारी जागेवर तीन भव्य असे बंगले उभारण्यात आले आहेत. या बंगल्याचे बांधकाम सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, मात्र आता देखील केवळ बंगल्याचे तोडकाम करण्यात आले आहे, याबाबत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.