ठाणे - मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने ५५ वर्षे वय वरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याचप्रमाणे शहरातील आणि जिल्ह्यातील ५५ वर्षे वयाच्या आणि त्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी मनसेचे पुष्कर विचारे यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. प्रशासनाला दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की आपले जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोरोनाच्या रूग्णांची वाढ होऊ नये, यासाठी जे मेहनत घेत आहात त्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊन अंमलबजावणी काटेकोर होत आहे.
आमचे पोलीस बांधव सेवा बजावत असताना खऱ्या अर्थाने कोरोनाशी दोन हात करत आहेत. विशेष म्हणजे वयाने ज्येष्ठ असणारे कर्मचारी विनातक्रार आपले कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे हे वयस्कर कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे पुष्कर विचारे यांनी या पत्रात म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांना असणारा धोका लक्षात घेऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हा दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी या पत्रात पोलीस आयुक्त यांना केली आहे.