ठाणे - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 300 गाड्यांपेक्षा अधिक आवक झाल्यास बाजार खारघरमधील मोकळ्या मैदानात भरवला जाईल. बाजार समितीतील गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्यास येथील बाजार हा खारघर सेक्टर 35 मधील सिडकोच्या मोकळया भूखंडावर स्थलांतरित करणार आहेत. त्यामुळे व्यापारी व ग्राहक खारघरमध्ये जाऊन व्यापार करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टनसिंग राखून खरेदी विक्री करण्यात आली. तसेच बाजारात होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खारघर येथील मोकळ्या मैदानात हा बाजार भरवला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खारघरच्या मोकळ्या मैदानात तात्पुरती व गाळ्यांची सोय करण्यासही सुरवात झाली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक व ग्राहकांची गर्दीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टनसिंगचा पूर्ण फज्जा उडविण्यात येत होता. मात्र, आज बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी मिळून गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्वांचे तापमान तपासून, हात स्वच्छ केल्यानंतर ग्राहकांना आत सोडण्यात येत होते.