नवी मुंबई -1998 पासून गव्हाण कोपर गावात राहणाऱ्या विकी देशमुख याने चोऱ्यांपासून गुन्हेगारीचा प्रवास सुरू केला. रायगड, नवी मुंबई, उरण, ठाणे, येथील विविध पोलीस ठाण्यात, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण दरोडा मारामारी जबरी चोरी या सारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलिसांनी विकीवर नियंत्रणासाठी त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची शिफारस केली. यानंतर अखेर कुविख्यात गुंड विकी देशमुख व त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यास मंजूरी मिळाली आहे.
तळोजा कारागृहात कैद्यांसोबत मैत्री करुन स्वतःची टोळी करून कारागृहात साम्राज्य निर्माण करण्यासाठी इतर कैद्यांना त्याने हाताशी धरुन कारागृह निरीक्षकावर गोळीबार केला. त्याचा नेरुळ येथे राहणारा साथीदार सचिन गर्जे याच्याशी झालेल्या पैशाच्या वादातून विकी व त्याच्या इतर साथीदारांनी सचिन गर्जे याचे अपहरण करून त्याची हत्या विकी व त्याच्या इतर साथीदारांनी केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. कल्याण येथील तहसीलदारांची सूपारी देऊन झालेल्या हत्येमध्येही विकी देशमुखचे नाव आले होते. पनवेल पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी वाहन पुढे घेण्यावरुन झालेल्या क्षुल्लक तंट्यावरुन धमकाविल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणात त्याच्यावर खंडणी जबरी चोरी, उरण परिसरात कंटेंनर फोडणे, अपहरण, मारामारी, खून,खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी यासारखे 31 गुन्हे विकी दाखल आहेत.
मोक्का अंतर्गत विकी सोबत विक्रांत कोळी (वय.22), नारायण पवळे (वय.27), रुपेश झिरळे (वय.37), तुषार कोळी(वय.25), यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये तळोजा कारागृहात आहेत. विकी देशमुख, जितेंद्र देशमुख, प्रीतम कोळी, रोशन कोळी, राकेश कोळी, परशुराम कोळी हे अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विकी देशमुख व त्याच्या साथीदारांनी केलेल्या संघटीत गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहता, पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची शिफारस केली होती. अखेर विकी देशमुख त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सतीश गोवेकर करत आहेत.