ठाणे - कल्याण लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील उल्हासनगर, डोंबिवली, कळवा या क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच खून, मारामाऱ्या, अपहरण आणि विनयभंग यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था पार बिघडली असून वारंवार खून, मारामाऱ्या, अपहरण आणि विनयभंग अशा प्रकारांनी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी उल्हासनगर मधील बारजवळ देखील एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. याशिवाय, अमली पदार्थांची प्रचंड प्रमाणात विक्री होत असून दोन दिवसांपूर्वीच बराच मोठा गांजा पकडला गेला होता. अनधिकृत बारची संख्या प्रचंड वाढली आहे. मुली आणि महिलांच्या देह विक्रीसाठी छुप्या खोल्या तयार केल्या गेल्या आहेत. अशी माहिती खासदार शिंदे यांना मिळाली आहे.
डोंबिवली शहरातील शेलार चौक येथे देखील २ दिवसांपूर्वी शुल्लक वादातून एका बाईकस्वाराची धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. येथून हाकेच्या अंतरावर टिळकनगर पोलीस चौकी असून तेथे एकही पोलीस कर्मचारी तैनात नसल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात देखील कळवा शहरात लुटमारीसाठी आलेल्या काही इसमांनी मेडिकलमध्ये काम करणाऱ्या असलेल्या एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. अशा भागांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांचा वचक देखील गुन्हेगारांच्या मनात राहिलेला नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे गऱ्हाणे शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मांडले. तसेच गुन्हेगारांची दहशत नागरिकांच्या मनातून निघावी यासाठी त्वरित कठोर पावले उचलण्यात यावीत. सर्व रहदारीच्या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. तर, लवकरच या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली.