कल्याण डोंबिवली (ठाणे) - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून आज (दि. 17 मार्च) दिवशी तब्बल 593 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, खासगी रुग्णालयात कोरोना लसीचा तुडवडा असल्याची बाब समोर आली आहे.
कोविड लसीचा तुडवड्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये निराशा
डोंबिवलीतील काही खासगी हॉस्पिटलमध्ये रोज मर्यादित स्वरूपात कोरोना लसीकरण करण्यात येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डोंबिवलीतीलच बाज आर आर रुग्णालयामध्ये दररोज केवळ शंभर जणांना लसीकरण करण्यात येते. मात्र, या रुग्णालयामध्ये लसीकरणसाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागत आहे. विशेष म्हणजे लसीकरणाच्या सुरुवातीला 200 नागरिकांना एका रुग्णालयात लसीकरण होत होते. मात्र, जे नागरिक सकाळी लवकर येतात त्यांचाच क्रमांक पहिल्या 100 जणांमध्ये येत असल्याने नियोजित वेळेवर येणारे ज्येष्ठ नागरिक निराश होऊन परत जात आहेत. शिवाय उन्हाळा सुरू झाल्याने गर्मीचा फटका त्यांना बसत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात रोजच्या लसीकरणाची संख्या वाढवावी, अशी मागणी राजू नलावडे यांनी केली आहे. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने लसीकरण मोहीम शहरात राबवली जात आहे. त्यातच सरकारी रुग्णालयात निःशुल्क मिळत असल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर काही खासगी रुग्णालयात 250 रुपये शुल्क घेऊन लस दिली जात आहे.
लस पुरवठा खासगी रुग्णालयात उपलब्ध करून द्यवा
नागरिकांच्या मते डोंबिवलीतील खासगी रुग्णालयाचा दोष नाही. मात्र, जर पुरेसा स्टॉक नव्हता तर तशी कल्पना दिली असती तर आम्ही एवढा वेळ थांबलो नसतो अशा प्रतिक्रिया काही वरिष्ठ नागरिकांनी दिल्या आहेत. त्यामुळे केडीएमसी व शासनाने खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध वेळीच करून दिली पाहिजे. त्यामुळे सरकारी रुग्णालयावर पडणारा ताण कमी होईल, असे डोंबिवलीचे राजू नलावडे यांनी सांगितले आहे.
रुग्ण संख्या पोहोचली 68 हजाराच्यावर
कल्याण डोंबिवली आजच्या या 593 रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 68 हजार 170 झाली आहे. यामध्ये 3 हजार 565 रुग्ण उपचार घेत असून 63 हजार 386 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या 593 रुग्णांमध्ये कल्याण पूर्व-84, कल्याण पश्चिम – 157, डोंबिवली पूर्व – 206, डोंबिवली पश्चिम – 88, मांडा टिटवाळा – 45 तर मोहना येथील 93 रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा - कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या 'छमछम'च्या मालकावर गुन्हा दाखल
हेही वाचा - 'अनेक वर्षे भूमिपुत्रांची फसवणूक करणाऱ्या सिडकोने आता निघून जावे'