ठाणे - सध्या सर्वत्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. त्यातच कोरोनापेक्षाही भयंकर असणाऱ्या रस्ते अपघातांकडे मात्र दुर्लक्ष होत असून, देशभरात कोरोनापेक्षा जास्त मृत्यू हे गेल्या वर्षी रस्ते अपघातमुळे झाले असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार
३७८ नागरिक अपघातात गंभीर जखमी झाले
विशेष म्हणजे, रस्ते अपघाताला आळा बसावा म्हणून वाहतूक विभागाकडून जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे. वर्षभरात ६६८ अपघातांमध्ये १९२ जणांचा मृत्यू कोरोनाच्या धास्तीने घोषित केलेल्या लॉकडाऊन ते अनलॉक काळात झाला आहे. ६६८ पैकी १८५ अपघात मध्यम स्वरुपाचे होते. तर, २९९ गंभीर स्वरुपाचे अपघात असून यामध्ये १९२ जणांचे जीव गेले आहेत. तसेच, ३७८ नागरिक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या जरी घटली, तरी आता पुन्हा अनलॉक काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने धावत असल्याने अपघाताची संख्या वाढत आहे. शहरी भागातील ७० टक्के वाहनचालकांनी जर वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताला आळा बसू शकतो, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातामुळे
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सुमारे १ लाख ५२ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. मात्र, या तुलनेत गेल्या वर्षी १ लाख ५४ हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला. यामुळे कोरोनापेक्षाही रस्ते अपघातांची समस्या गंभीर आहे. देशात दरवर्षी ५ लाखाच्या आसपास अपघात होतात, त्यापैकी दीड लाखाच्या आसपास मृत्युमुखी पडतात, तर सुमारे ४ लाख नागरिक कायमचे जायबंदी होत आहेत. दरवर्षी, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अपघाताने मृत्यू होत असतील तर नागरिकांना या गंभीर विषयी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत पोलीस उपाआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - एक कोब्रा नाग पोपटांच्या पिंजऱ्यात, दुसरा पडवीत तर तिसरा पाईपमध्ये...!