ठाणे - मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-कोपर, डोंबिवली स्थानकादरम्यान लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या महिलांचे फटका मारून मोबालईल लांबविणाऱ्या कुख्यात फटक्याला जेरबंद करण्यात डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून आत्तापर्यंत 2 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले असले तरी त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. विशाल दिगंबर सुर्यवंशी (वय 23 वर्षे) असे या फटक्याचे नाव असून तो हाजीमलंग रोडला असलेल्या मांगरुळ गावचा रहिवासी आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास ज्योत्स्ना आशिष आंगरे (वय 32 वर्षे, रा. डोबिंवली) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या विक्रोळी ते डोंबिवली असा धिम्या लोकलने दरवाजात उभे राहून प्रवास करत होत्या. ही लोकल डोंबिवलीकडे येत असताना कोपर स्थानकाच्या विरूद्ध बाजूस उभ्या असलेल्या एकाने त्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल खाली पाडला.
हेही वाचा - प्रेम प्रकरणात आडवा येणाऱ्याचा चिरला गळा, प्रियकरासह तिघांना अटक
या घटनेची माहिती महिलेने पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार काळे, परदेशी, भोजने, आदींनी सदर महिलेसह कोपर रेल्वे स्थानक येथे जाऊन शोध घेतला. परंतु, हा चोरटा आढळून आला नाही. त्यानंतर मात्र, महिलेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे चोरट्याचा शोध घेतला असता पोलिसांना एका वडापावच्या हातगाडीवर हा व्यक्ती आढळून आला. पोलिसांनी लागलीच त्याच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा - अंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा कामवारी नदी पात्रात बुडून मृत्यू
विशालला पकडण्याच्या थोड्या वेळापूर्वी त्याने रचना पवार या महिलेचा मोबाईल फटका मारून चोरला होता. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली होती. त्या आसनगाव लोकलने दरवाजात उभे राहून प्रवास करत होत्या. त्यांच्या हातावर फटका मारुन या महिलेचा मोबाईल याच चोरट्याने लांबविला. या चोरट्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ प्रवासी महिलांचे लांबविलेले दोन्ही मोबाईल आढळून आले आहे. बुधवारी या चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.