ठाणे : जमावाने अल्पवयीन मुलाला मारहाण करत घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेत मारहाण झालेल्या मुलाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 21 जुलैला घडली होती; मात्र अपहरणाची घटना उघडकीस आल्यानंतर या अल्पवयीन मुलाला जमावाने मारहाण केली. हे दोघेही अल्पवयीन असून अंबरनाथ शहरात राहणारे आहेत. या दोघात प्रेमसंबंध असल्याने अल्पवयीन मुलाने त्या मुलीचे एक महिन्यापूर्वी अपहरण केले होते. त्यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्यात मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला त्याचवेळी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.
माजी आमदार वारीस पठाण यांनी केला व्हिडिओ शेअर : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करत टीका केली आहे. मुंबईत अशी घटना घडते, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका वारीस पठाण यांनी केली आहे. वांद्रे टर्मिनस येथे अल्पवीयन मुलासोबत त्या मुलीला काही प्रवाशांनी पकडून मारहाण करून नंतर वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र मारहाणीचा प्रकार आमच्याकडे झाला नसल्याचे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.
तरुणाला जमावाकडून मारहाण : या व्हिडिओमध्ये लाल शर्ट घातलेल्या तरुणाला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. त्यावेळी तरुणाची मैत्रीण जमावाला विरोध करत आहे. या घटनेत मारहाण झालेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यानंतर जमावाने रेल्वे स्थानकाबाहेर ओढत नेले. त्यानंतर जमावाने घोषणा देत मुलाला कॉलर पकडून बाहेर ओढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दोघे पळून जाण्याच्या तयारी : दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन यात सहभागी असलेल्या सर्व गुंडांना अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माजी आमदार वारीस पठाण यांनी केली. भविष्यात असे कृत्य करण्याचा कोणी विचार करणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पीडित अल्पवयीन मुलगी अंबरनाथ शहरातील असून तिचे मूळ गाव राजस्थान राज्यातील झालोर जिल्ह्यात आहे. तर अल्पवयीन मुलगा हा अंबरनाथ शहरात राहणारा आहे. घटनेच्या दिवशी ते दोघे पळून जाण्याच्या तयारी होते, अशी माहिती सूत्राने दिली आहे.
अल्पवयीन मुलावर अपहरणाचा गुन्हा: याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता, मुलगा अल्पवयीन असून मुलगीही अल्पवयीन आहे. ही घटना एक महिन्यापूर्वीची आहे. त्यावेळी अल्पवयीन मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर बाल न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे; मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण पुन्हा तापल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा -