ठाणे - पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण होत नसल्याने दरवर्षी ठाण्यात विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. तुंबलेल्या नाल्यामुळे आसपासच्या वसाहतींत पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिक नालेसफाई करण्याची मागणी पालिकेकडे करत आहेत. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील गोकुळनगर येथील नाल्यामध्ये उतरत आंदोलन केले.
मनसे कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी ठाण्यातील गोकुळनगर येथील नाल्यामध्ये उतरत नालेसफाई संदर्भात आंदोलन केले. लवकरात लवकर नालेसफाई करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ठाणे गोकुळनगर येथील रहिवाशी उपस्थित होते. नाल्याचे काम उद्यापासून (शुक्रवार) चालू होत आहे. जेसीबीच्या सहाय्याने काम करणार असे नगरपालिका अधिकारी व ठेकेदार यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .