ठाणे - गेल्या काही दिवसांत विविध मुद्द्यांवरून येथील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला घेरण्याची रणनीती भाजपा आणि मनसेकडून आखली जात आहे. आता 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी अद्याप का देण्यात आली नाही? यावरुन दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ निवडणुकीपुरते शिवसेनेने करमाफीचे वचन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर 'क्या हुआ तेरा वादा?' म्हणत मनसेकडून ठाणे मनपाच्या मुख्यालयाच्या बाहेर आज (गुरुवारी) थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
तर दुसरीकडे भाजपाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी 'क्या हुआ तेरा वादा?' या आशयाचे फलके लावण्यात आले आहेत. तर भाजपाकडून करण्यात आलेली फलकबाजी ही मनसेची घोषणा आहे. भाजपाने ती चोरली असल्याच्या आरोप मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेत भाजपाचे 24 नगरसेवक असताना ते रस्त्यावर का उतरत नाहीत? ते काय झोपा काढतात का? असा टोला जाधव यांनी भाजपाला लगावला आहे. क्या हुआ तेरा वादा ही घोषणा आमचीच आहे. भाजपा नेते ते चोरत होते. आता आंदोलनही चोरायला लागले आहेत कि काय? अशी टीका जाधव यांनी केली.
तर 'ठाण्यात शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना' असे बोलले जाते. मात्र, कोणत्याही आश्वासनाची पूर्तता शिवसेनेकडून होत नाही. निवडणुकीत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना अजूनही करमाफी देण्यात आलेली नाही. लोकांची मते घेतली आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.