ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नीती साफ असून त्यांनी कल्याण ग्रामीणमधील २७ गावासाठी वेगळी स्वतंत्र महापालिका करण्यास सकारात्मक भूमिका घेतली. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नियत साफ नाही. यामुळेच २७ गावासाठी स्वतंत्र महापालिका करण्यास, नगर विकास विभागाकडून वेळ काढूपणा धोरण राबवले जात आहे. असा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. दरम्यान पाटील यांच्या या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सन १९८२ विकासाच्या मुद्द्यावर कल्याण तालुक्यातील २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या गावातील गुरा-ढोरांच्या गोट्याला आणि राहत्या घरालाही सारखेच कर आकारण्यात आले. कर आकारले पण या गावांना सुविधा देण्यात आल्या नाहीत. तेव्हा या निर्णयाच्या विरोधात २७ गावातील ग्रामस्थांनी संघर्ष समितीची स्थापना करून आंदोलनाची हाक दिली होती. मात्र स्थानिकांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण व वाढत्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर २७ गावे महापालिकेत उघडून २००२ रोजी ग्रामपंचायतीच्या स्थापना झाल्या. या ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या विरोधात जाऊन राज्य शासनाने १ जून २०१५ रोजी ही गावे पुन्हा महानगरपालिकेत समाविष्ट केली. २७ गावासाठी स्वातंत्र्य महानगरपालिकेचा विषय शासन तसेच न्यायालयीन दरबारी येत आहे. तोपर्यंत या गावांमध्ये ग्रामपंचायत दराप्रमाणे मालमत्ता कर आकारणी करावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी महापालिकाकडे केली होती.
ही गावे महापालिकेत समाविष्ट करताना या गावांना मूलभूत नागरिक सुविधा पुरवून नियोजनबद्ध विकास करण्याचे ठरले. परंतु तसे न होता या गावातील केवळ मालमत्ता कर दहापट आकारणी केली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेला विरोध करताना २७ गावाची विकास नियंत्रण नियमावली लागू करून २७ गावासाठी वेगळी स्वतंत्र महानगरपालिका करावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
दरम्यान याच मागणीसाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नीती साफ आहे. मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नियत साफ नसल्याने २७ गावासाठी वेगळी स्वतंत्र महापालिका करण्यास नगरविकास विभागाकडून वेळ काढूपणाचे धोरण राबवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी आगामी महानगरपालिका मनसे स्वबळावर लढणार असल्याचेही सांगितले.