ठाणे - कालपासून सुरु असलेल्या राणे विरुद्ध शिवसेनेच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ट्वीट करत जंगी 'सामना' तंगी 'प्रहार' म्हणत राणे विरुद्ध शिवसेनेत सुरु असलेल्या वादात मिश्किलपणे टीका करत चिखलफेख विरुद्ध दगडफेक, असा टोमणा मारला आहे.
या वादात मनसेची उडी -
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी दुपारी रत्नागिरीत अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राणेंच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र यातून दिसत आहे. रत्नागिरी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. राणेंच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून राणेंविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे. त्यातच मनसेचे या वादात उडी घेतल्याने राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते राणे -
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जनआशीर्वाद यात्रे दरम्यान रायगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 'मी असतो तर कानाखालीच चढवली असती.' असे पत्रकार परिषदेत राणे म्हणाले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोकणात आलेल्या राणेंनी रायगड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. नाशिक पोलिसांच्या कारवाईनंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंच्या अटकेची कारवाई केली आहे.
हेही वाचा - VIDEO : नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या कुलाबा शाखेसमोर फटाके फोडले