ठाणे : गेले काही दिवस महाराष्ट्रतील विविध वीज पुरवठा करणाऱ्या आस्थापनांकडून ग्राहकांना अवाजवी बिलं आकारण्यात आली आहेत. ह्याविषयी मनसे शिष्टमंडळाने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन पक्षाच्यावतीने निवेदन सादर केले.
लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच-तीन महिने बंद असलेले वीज मीटर रिडींग व वीज बिलाचे वाटप महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. त्यासंदर्भात सर्व भागातून वाढीव वीज बिलाच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून आल्या आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले असताना दुसरीकडे आवाजावी बिलाची रक्कम ही नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. काही नागरिकांनी विजेचा वापर केला नाही. तरीही त्यांना दुप्पट-तिप्पट वीज बिल आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विविध मुद्यावर करत ग्राहकांना सुधारित वीज बिलात ५० % सवलत देण्यात यावी. ग्राहकांना बिल भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा, कोणत्याही परिस्थितीत मीटर लाईन / वीज पुरवठा खंडीत करू नये. ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे, आदी मुद्दे मनसेने उपस्थित केले. हे सर्व मुद्दे उर्जामंत्र्यांनी समजून घेतले आणि लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचे मान्य केले.
या बैठकीत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, सरचिटणीस नयन कदम, उपाध्यक्ष अरविंद गावडे, नंदकुमार चिले आदी उपस्थित होते.