ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
कल्पिता पिंपळेंवर हल्ला; प्रकरण काय?
मानपाडा-माजिवडा प्रभाग समिती क्षेत्रातील कासारवडवली बाजारात एका अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करत असताना फेरीवाल्याने धारदार सुरीने अचानक हल्ला चढवला. त्याचा हल्ला एवढा प्राणघातक होता की त्यात कल्पिता पिंपळे यांना आपल्या डाव्या हाताची दोन, तर त्यांच्या अंगरक्षकाला एक बोट गमवावा लागला होता.
हेही वाचा - hawker attack : 'त्या' हल्लेखोराने पाठीमागून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला - कल्पिता पिंपळे
अमर्जीत यादव या माथेफिरूचा घाव हातावर झेलला नसता तर कदाचित त्यांना आपला जीव देखील गमवावा लागला असता. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिथूनच त्यांनी आपला निग्रह बोलून दाखवला. असल्या हल्ल्यांना आपण भीक घालत नाही व ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण महापालिकेचे जबाबदार अधिकारी असून असल्या भ्याड हल्ल्यांना भीक घालत नसून बरे होऊन येताच पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू होऊन पाहिल्या सारखीच कडक कारवाई करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज यांची पोलिसांसोबत चर्चा -
ठाणे पोलिसांकडून सोमवारी घडलेल्या घटनेची राज यांनी माहिती घेतली. ठाकरे यांनी ठाणे पोलिसांशी बातचीत केली. परप्रांतीय फेरीवल्याचा बंदोबस्त पोलिसांनी करायला हवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी ठाणे पोलिसांनी केली. या हल्ल्यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांच्याशी चर्चा केली आणि अशा प्रवृत्ती ठेचून काढण्याची मागणी केली.