ठाणे - वाहनांच्या पाट्यांवर असलेल्या मराठी अंकांवरील कारवाया अद्याप थांबल्या नाहीत. परिवहन विभाग अर्थात आरटीओकडून वाहनचालकांवर वारंवार कारवाया केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही मराठीसाठी आम्हाला झगडावे लागते हे दुर्दैव असून एका मराठी वाहनधारकाला दोनदा भुर्दंड भरावा लागतो ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते तथा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री कार्यालयाला गुजराती भाषेत ट्विट करून खडे बोल सुनावले आहेत. विशेष म्हणजे रविवारी शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी "मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा", अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती. म्हणून कदाचित त्यांना गुजरातीत केलेली विनंती कळेल व यावर काही निर्णय करतील अशी खात्री पटली व म्हणून गुजरातीत ट्विट केले असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
![मनसे आमदाराचे गुजरातीत ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-1-mns-2-photo-mh-10007_12012021125139_1201f_1610436099_973.jpg)
महाराष्ट्राबद्दलचा अहंकार मराठीबाबतही दाखवावा
वाहनांवरील मराठी पाट्यांवर होणाऱ्या कारवायांसंदर्भात यापूर्वी आपल्याकडे असंख्य तकारी आल्या. अशीच एक तक्रार पुन्हा प्राप्त झाली. सोमवारी मुलूंडमधून एका व्यक्तीचा मेसेज आला. त्यांना नंबर प्लेट मराठीतून असल्याने दोन वेळा दंड आकारण्यात आल्याने आपण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाला गुजराती भाषेत ट्विट करावे लागले. मराठी सोडून गुजरातीचा कळवळा असलेल्या मुख्यमंत्र्यांना किमान या भाषेत तरी कळेल, या हेतूने त्यांना ट्विट केल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे मराठी असूनही मराठीसाठी आम्हाला भांडावे लागते हे दुर्दैव असल्याची टिका करणारे ट्विट करत आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केले. मुंबई, महाराष्ट्राबद्दलचा अहंकार मराठीबाबतही दाखवावा, असे आवाहन करणारे ट्विट आमदार पाटील यांनी केले आहे.
मराठी भाषेतील नंबरप्लेटवर कारवाई
आमदार पाटील यांनी दाखला देताना सांगितले की, शिवसेनेकडे सत्ता आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तरी मराठीसाठी आम्हाला भांडावे लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. वाहनांवर मराठी भाषेत नंबरप्लेट लावलेल्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे. मराठी अस्मितेबद्दल सरकारला काही देणेघेणे दिसत नसल्याने मराठी नंबरप्लेटच्या वाहनांवर वारंवार कारवाया केल्या जातात. त्यामुळे मराठीला कायदेशीर मान्यता द्यावी आणि अहंकाराने मराठीचा स्वाभिमान वाढवावा, असे आवाहन आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यासाठी वेधले लक्ष
भाजपाकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजराती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हाच धागा पकडून आमदार राजू पाटील यांना गुजराती भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव