नवी मुंबई - कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनने, नागरिक आर्थिक संकटात आहेत. तर दुसरीकडे वीज महावितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव बिले पाठवून मोठा धक्का दिला आहे. अशा या काळात नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रें या समोर आल्या आहेत. त्यांनी, नवी मुंबईतील वीज ग्राहकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली वाढीव बिलाची रक्कम कमी करणे तसेच बिलाची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ व हप्त्याने भरण्यास मुभा मिळावी, यासाठी महावितरणाच्या अधिकारी वर्गाची भेट घेतली.
लॉकडाऊनच्या काळात गेल्या 3 महिन्यांपासून वीज ग्राहकांना विजेचे बील आले नाही. मात्र, आता एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने नवी मुंबई व पनवेल परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या संकटात कित्येक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर कित्येकांच्या पगारात कपात झाली आहे. असे असताना अचानक आलेल्या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे. वीज मंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरोघरी वीज रिडींग घ्यायला गेलेच नाहीत. रिंडींग घेतले नसले, तरी महामंडळाने अगदी अंदाजानेच बिल तयार करुन ग्राहकांना पाठवले असल्याने चित्र नवी मुंबई शहरात दिसत आहे. लॉकडाऊननंतर आलेली ही बिलं अव्वाच्या सव्वा असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. एकीकडे आर्थिक संकट व दुसरीकडे अवास्तव वीज बिल यांचा मेळ कसा बसवावा? हा वीज ग्राहकांसमोरील मोठा प्रश्न आहे.
कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या ग्राहकांना आता 3 महिन्यांचे बील एकदम भरणेही शक्य नाही, असे मत ग्राहक व्यक्त करत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील वीज ग्राहकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली वाढीव बिलाची रक्कम कमी करणे तसेच बिलाची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ व हप्त्याने भरण्यास मुभा मिळावी, म्हणून बेलापूर विधानसभा मतदार क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रें यांनी एम.एस.ई.डी.सी.एल.चे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे यांची भेट घेतली.
नवी मुंबईतील ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी मुभा मिळावी, ही विनंती आमदार म्हात्रे यांनी केली आहे. तसेच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रश्नी निवेदन दिले आहे.
हेही वाचा - भिवंडीत पाइप लाइनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्वारंटाईन केंद्रातून फरार