नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांना पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारली असता मी शेतकऱ्यांचा आमदार नाही, असे वक्तव्य त्यांनी आज (सोमवार) नवी मुंबई महापालिका मुख्यालयात केले.
सद्यस्थितीत अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत पक्षपात करीत आहे, असे म्हटले होते. ऐरोली मतदारसंघाचे आमदार व भाजप नेते गणेश नाईक नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आले असता, त्यांची राजू शेट्टी यांच्या वक्तव्यावर काय भूमिका आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मी शेतकऱ्यांचा आमदार नाही, असे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. नवी मुंबईत शेतकरी नाहीत, इथे सुशिक्षित बेकार व दुकानदारांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी खेड्यातील शेतकऱ्यांचा आमदार असतो तर, या प्रश्नी प्रतिक्रिया दिली असती, असे ते म्हणाले.
हेही वाचा - कळवा-ऐरोली 'एलिव्हेटेड रेल्वे मार्ग' लवकरच... खासदार राजन विचारेंची माहिती