ठाणे - एकीकडे राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही आमदारांनी फुटून अजित पवार यांच्यासोबत भाजपशी हातमिळणी केल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला. हा भूकंप घडविण्यात शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडाचाही सहभाग असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र आमदार दरोडांनी मी राष्ट्रवादीत असल्याचे जाहीर करून ४८ तासांच्या राजकीय नाट्यावर पडदा टाकला. यामुळे ज्या आमदार दौलत दरोडांना दिवंगत आनंद दिघेंनी घडवले, त्याच दरोडांना अजित पवारांनी बिघवडल्याची चर्चा शहापुरकरांमध्ये रंगली आहे.
हेही वाचा - वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी वागणूक, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मागितली माफी
आमदार दौलत दरोडा शहापूर तालुक्यातील कोठारे या आदिवासी पाड्याचे रहिवाशी असून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नोकरीच्या शोधात स्वर्गीय आनंद दिघेंकडे १९९५ गेले होते. त्यावेळी दिघेंनी त्यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वसन दिले. विशेष म्हणजे त्याचवेळी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. त्यांनतर दिघेंनी शहापूर मधून काँग्रेसचे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी दरोडा यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून जाहीर केले. तोपर्यंत दरोडा यांना कसलाच थांगपत्ता नव्हता. ज्यावेळी आनंद दिघे शहापुरात दरोडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी दरोडा हे माळरानात पाखरांच्या शिकारीसाठी गेले होते. त्यांना रानातून बोलावून त्यांना विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. घरात राजकारणाचा कुठलाही वसा नसताना दौलत दरोडांना आनंद दिघेंनी युतीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचे स्वर्गीय माजी आमदार महादू बरोरा यांच्यासमोर उभे केले. त्यावेळी शहापुरात १९ जानेवारी १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरेंची पहिली प्रचार सभा झाली. या सभेचा परिणाम होऊन १९९५ झाली पहिल्यांदा दौलत दरोडा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनतर १९९९ झाली पुन्हा युतीचे आमदार म्हणून दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. २००४ साली मात्र स्वर्गीय माजी आमदार महादू बरोरा यांनी दौलत दरोडा यांचा पराभव केला. तर २००९ झाली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने महादू बरोरा यांना तिकीट नाकारून त्यांचा मुलगा पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी दिली. त्यावेळीही पुन्हा दौलत दरोडा यांनाच सेनेच्या वतीने युतीचा उमेदवार जाहीर करून मैदानात उतरवले. २००९ मध्ये पांडुरंग बरोरा यांना पराभूत करून तिसऱ्यांदा दौलत दरोडा निवडून आले. मात्र २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युती फिस्कटल्याने तिरंगी लढत झाली होती. यात शिवसेनेचे दौलत दरोडा यांचा ५,५०० मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा मोदी लाटेतही विधानसभेवर निवडून गेले होते. त्यात भाजपचे अशोक इरनक यांनी १८ हजार मते मिळवली होती.
दरम्यान, २०१९ मध्ये शहापुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय भूकंपाचे हादरे बसले होते. राष्ट्रवादी सोडून आमदार पांडुरंग बरोरा शिवबंधनात अडकले. मात्र यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेत असलेले आमदार दौलत दरोडा सेनेतील इच्छुकांच्या गटासह 'मातोश्री'वर पोहोचले. त्यानंतर बंडाच्या तयारीत असलेल्या इच्छुकांमध्ये पक्षबदलाचे वारे वाहत होते. अखेर सेनेचे दरोडा यांनी निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत उडी मारून तालुक्यात घुसळून निघालेल्या वातावरणाला रंग चढवला. यामुळे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापूर विधानसभा निवडणुकीत 'आरसा तोच, बदलले केवळ चेहरे' अशी परिस्थिती निर्माण झाली. आजी - माजी आमदारांनी पक्ष बदल करत राष्ट्रवादीच्या तिकिटावरून लढणारे सेनेचे माजी आमदार उमेदवार दौलत दरोडा आणि राष्टवादी सोडून शिवसेनेत दाखल झालेले पांडुरंग बरोरा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेष म्हणजे दरोडा यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासह आनंद दिघेंचा फोटो आणि भगवे झेंडे लावून मतदारांना भावनिक आव्हान करून मीच सच्चा शिवसैनिक असा प्रचार करून शिवसेनेचे पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला.
४० वर्षांनंतरही दरोडा विरुद्ध बरोरा या नावांची प्रतिस्पर्धी जोडी मतदारांसमोर अस्तित्वाची लढाई लढत आहेत. यंदाच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा बदलून दरोडा आणि बरोरा हे दोन्ही तुल्यबळ चेहरे शहापूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात पहिलवानासारखे दंड थोपटून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ४० वर्षांचा काळ पाहिला तर महादू बरोरा चारवेळा, दौलत दरोडा आता चौथ्यांदा निवडून आले. तर पांडुरंग बरोरा यांनी विधान सभेचे साडेचार वर्ष राष्ट्रवादीचे आमदार म्हणून सदस्यपद भूषवले.