ठाणे - मीरा भाईंदर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. बांधकाम भूमाफियाकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऐंशीपेक्षा अधिक बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सदर कारवाई मनपा उपायुक्त अजित मुठे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.
कोरोना महामारीकाळात मनपा प्रशासन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कार्यरत होते. त्याच काळात भूमाफिया यांनी संधी साधत अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट लावला होता. या संदर्भात अनेक तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. मात्र, मनपा प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही आहे. अनधिकृत बांधकाम तयार होत असताना अधिकारी कर्मचारी का फिरकत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारात आहेत. शहरात होत असलेले अनधिकृत गाळे, खोल्या, गॅरेज तसेच भ्रष्ट अधिकारी आणि बांधकाम माफिया यांच्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा देखील आरोप होत आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग चारमधील आरक्षण क्रमांक २५९, २९८, २९९ मधिल आरक्षित भूखंडावरील अनधिकृत गाळे दुकाने खोल्या अशी एकूण ऐंशीपेक्षा अधिक बांधकामे तोडण्यात आली. सदर बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी नसून बांधकाम करण्यात आले होते. अशा बांधकामांमुळे पालिकेच्या विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. सदर बांधकाम माफिया खोल्या, दुकाने बांधून गरीब गरजूंना विकत आहेत किंवा भाडेतत्त्वावर देत आहेत. यामुळे गरिबांची फसवणूक केली जात आहे. अशा भूमाफियांवर कायदेशीर कारवाईदेखील अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप राणे यांनी दिली.
हेही वाचा - भिवंडी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा वाद प्रदेश समितीकडे