मीरा भाईंदर (ठाणे) : मिरा-भाईंदर रस्त्यावरील जालजा लॉजिंग बोर्डींगच्या अवैध बांधकामाला न्यायालयीन स्थगन आदेश मिळण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणारे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा आयुक्त दालनाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिला आहे.
मिरा-भाईंदर रस्ता, एस.के स्टोनसमोर रॉयल चॅलेंज या निवासी इमारतीअंतर्गत फेरबदल करून या ठिकाणी जालजा नावाच्या लॉजिंग बोर्डींगचे काम बेकायदेशीररित्या बिनबोभाटपणे सुरू आहे. या कामासंदर्भात माजी आयुक्त बालाजी खतगांवकर आणि चंद्रकांत डांगे यांनी ठोस भूमिका घेत काम रोखले होते. परंतु, आता प्रभाग अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने या लॉजिंग बोर्डींगचे काम जोरात सुरू आहे.
तत्काळ न्यायालयात केविएट दाखल करण्यात यावा
या संदर्भात सदरहू अवैध बांधकामाविरोधात कारवाई करून संबंधितांविरूद्ध एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच या बांधकाम संदर्भात न्यायालयीन स्थगिती आदेश मिळू नये, याकरीता तत्काळ न्यायालयात केविएट दाखल करण्यात यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले असता या आदेशाला प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी धाब्यावर बसविले आहे. संबंधित लॉजिंग बोर्डींगचा मालक आणि क्षेत्रिय प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या संगनमताने या लॉजिंग बोर्डींगच्या अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयीन स्थगन आदेश प्राप्त झाला आहे.
विधी विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता
सदरहू इमारतीमध्ये अंतर्गत फेररचना करण्यासंदर्भात नगररचना विभागाकडे जालजा हॉटेल मालकाने परवानगी मागितली असता हा प्रस्ताव नगररचना विभागाने मागील तीन वर्षापूर्वीच फेटाळून लावलेला आहे. मात्र, न्यायालयात अंतर्गत फेररचनेच्या मुद्द्यावरून स्थगन आदेश प्राप्त करणाऱ्या या हॉटेल मालकाच्या भूमिकेला विधी विभागाने कोणत्याही प्रकारचा विरोध न्यायालयात दर्शविला नसल्याने विधी विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, स्थगन आदेश मिळणेकामी संशयास्पद भुमिका वटविणाऱ्या प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांना मनपा सेवेतून निलंबित करण्यात यावे, अन्यथा आयुक्त दालनासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रशांत दळवी यांनी दिला आहे.