ठाणे - एका अल्पवयीन चोरट्याने दुचाकीवर फेरफटका मारून मौजमजा करण्यासाठी त्याने उल्हासनगर शहरातून आठ दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात या अल्पवयीन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या आठ दुचाकी (अॅक्टिव्हा) हस्तगत केल्या आहेत.
उल्हासनगर शहरात दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष करून उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रमाण जास्त आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दुचाकी चोरी करणाऱ्यांना त्वरित अटक करा, असे आदेश पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीसअधिकारी व कर्मचाऱ्यांना गुप्त महितीदारामार्फत माहिती मिळाली की, उल्हासनगर-२ येथील भैय्यासाहेब आंबेडकरनगर या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा सफेद रंगाची अॅक्टिव्हा घेऊन संशयास्पदरीत्या फिरत आहे. या माहितीच्या आधारे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. काही वेळाने त्या ठिकाणी अल्पवयीन मुलगा नमूद दुचाकीने आला. पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडील दुचाकी चोरी केलेली असल्याचे त्याने सांगितले. तसेच पुढील तपासात त्याने अॅक्टिव्हा कंपनीच्या एकूण ८ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
२ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगस्त
पोलिसांनी या आठही दुचाकी हस्तगत केल्या असून एकूण २ लाख ५८ हजारांचा हा मुद्देमाल आहे. यातील पाच दुचाकी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तर, एक दुचाकी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्या आहेत. अद्याप दोन दुचाकी कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्या, याचा पोलीस तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस कर्मचारी एम. आर. श्रीवास, सुजित निचिते, सुजीत भोजने, धनंजय सांगळे, चंद्रकांत बोरसे या पोलीस पथकाने यशस्वीपणे हा गुन्हा उघडकीस आणला.
दुचाकी चालविण्याच्या हौसेपायी बनला गुन्हेगार
या संदर्भात उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना विचारले असता, ते म्हणाले की, सदर अल्पवयीन मुलगा हा शौक पूर्ण करण्यासाठी या चोऱ्या करीत होता. त्याने चोरी केलेल्या दुचाकी कोणाला विकल्या नसल्याचे सांगितले. तो चोरी केलेल्या दुचाकी स्वतःच वापरत असे.