फूस लावल्याने पळाली मुंब्र्यातील अल्पवयीन मुलगी; झाशीमध्ये ताब्यात - minor girl ran firojpur
14 वर्षीय मुलगी ही दिल्लीला जाणाऱ्या फिरोजपूर एक्स्प्रेसने(गाडी नं 02137) चालली होती. दुसरीकडे तिला फूस लावून पळवून नेणारा आरोपी हा मुलीला दिल्ली येथे भेटणार होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार झांशी पोलिसांशी संपर्क साधून त्या मुलीस फूस लावणाऱ्या व्यक्तीला भेटण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.
ठाणे - मुंब्रा येथील रहिवासी असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिल्लीतील आरोपीने फूस लावल्यामुळे पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा शोध घेत गुन्हे शाखेचे पथकाने ती दिल्लीला जाण्याआधीच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
झाशी पोलिसांच्या मदतीने कामगिरी फत्ते-
गुन्हे शाखा पथकाचे हवालदार अबुतलीब शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय मुलगी ही दिल्लीला जाणाऱ्या फिरोजपूर एक्स्प्रेसने(गाडी नं 02137) चालली होती. दुसरीकडे तिला फूस लावून पळवून नेणारा आरोपी हा मुलीला दिल्ली येथे भेटणार होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शोध कार्य सुरू केले. तसेच याबाबतची माहिती झाशी जी.आर.पी. इंचार्ज सुनीलकुमार सिंग यांना दिली आणि या प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याची झाशी पोलिसांना विनंती केली.
झाशी रेल्वे पोलिसांनी 22 जानेवारीला संबंधित रेल्वे ट्रेन फिरोजपूर स्टेशनमध्ये थांबल्यानंतर त्या 14 वर्षीय मुलीस शोधून ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीला पुढील कारवाईसाठी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
डझनभर कारवाया
ठाणे गुन्हे शाखेने अशा पद्धतीच्या यूपी-बिहार पश्चिम बंगाल भागातून अनेकदा कारवाया करून अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. ठाणे गुन्हे शाखेने आता आपले जाळं महाराष्ट्राच्या बाहेर पसरल्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेलेल्या अनेक गुन्हेगारांना गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.