ठाणे - लोकलमधील महिलांच्या डब्यात एका अल्पवयीन मुलाने अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. प्रवासी महिलांकडे पाहत या मुलाने अश्लील चाळे केल्याने महिला घाबरुन गेल्या. याबाबतचा व्हिडीओ एका प्रवासी महिलेने चित्रित केला असून ट्विटरद्वारे मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी या विकृत मुलावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. शनिवारी सायंकाळी ६.३२ वाजता ठाणे लोकलमधील महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात हा प्रकार घडला. चार महिला लोकलमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी एक मुलगा डब्यात शिरला आणि त्याने अश्लील चाळे करायला सुरुवात केली.
हा प्रकार पाहिल्यानंतर एका महिलेने त्याला लोकलमधून उतरून जाण्यास सांगितले. मात्र, विकृत मुलगा काही हलायला तयार नव्हता. त्यानंतर इतरही महिला पुढे सरसावल्या. आरडाओरडा करत मुलाला डब्याच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न केला. तरीही डब्यातून बाहेर जात नसल्याने महिलांनी त्याला बळजबरीने डब्याच्या बाहेर काढले.
हा मुलगा मनोरुग्ण नव्हता. तसेच तो फेरीवालाही नव्हता, असे या महिला प्रवाशांचे म्हणणे आहे. रात्री ९ नंतरच महिला डब्यामध्ये सुरक्षा रक्षक येतात. या घटनेमुळे महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ट्विटर वरुन तक्रार करताना महिलांनी संताप व्यक्त केला आहे.