ठाणे - अल्पवयीन मुलगा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. त्यावेळी तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या मुलाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने त्याला हटकले असता त्या मुलाने कंबरेला खोचलेला धारदार चाकू काढून त्याच्या पोटात खुपसला. त्यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला. रवी पारचा, असे जखमी तरुणाचे नाव आहे. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक ३ परिसरातील फॉरवड लाईनमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे वाचलं का? - नोकराने फसवले मालकाला, परस्पर २ कोटींचा माल केला लंपास
उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक ३ परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा राहतो. तो त्याच परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेला. मात्र, त्या मुलीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या रवीने येथे शिवीगाळ का करतोस? आमच्या घरी महिला आहेत, अशा शब्दात त्याला हटकले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने कमरेला खोचलेला चाकूने रवीवर हल्ला चढवला. त्यामध्ये रवी गंभीर जखमी झाला आहे.
हे वाचलं का? - केडीएमसीत लाचखोरीचे सत्र थांबेना; वॉर्ड अधिकाऱ्यासह पर्यवेक्षकावर लाचखोरीचा गुन्हा
रवीला प्रथमोपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी मुलाचा भाऊ राजेंद्र पारचा यांच्या तक्रारीवरून त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.