ठाणे - प्रजासत्ताक दिनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील 6 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातील ५७ पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार असून, यामध्ये ठाण्यातील 6 जणांचा समावेश आहे. 57 पैकी चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना पोलीस शौर्य पदक तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
ठाण्यातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना पदक
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक व गुणवत्तापूर्ण सेवा पदके देऊन पोलिसांचा गौरव केला जातो. प्रजासत्ताक दिनी ठाण्यामधील 6 जणांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती उर्फ एन.टी. कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपाधीक्षक संगीता शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर झाले आहे. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, पोलीस मुख्यालयातील स.पो. उपानिरीक्षक थॉमस डिसोझा, गुन्हे शाखेचे स.पो. उपानिरीक्षक सुरेश मोरे आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे.