ठाणे - कल्याण-डोंबिवली नंतर ठाण्यातही कोविड सेंटर उभारणीत घोटाळा झाला असून केवळ कंत्राटदारांसाठी उभारलेल्या या कंत्राटांचे मातोश्रीशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. या आरोपातून सोमैया यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, या सर्व व्यवहारांची काळी पत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी सोमैया यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक प्रकरणावर बोलताना एका घोटाळ्यात भुजबळ हे तीन वर्ष तुरुंगात होते, आता घोटाळेबाज सरनाईक किती वर्षासाठी जातात, हे बघूया, असा टोलाही सोमैया यांनी लगावला.
हेही वाचा - बलात्कार करून तरुणीला लोकलमधून ढकलले; वाशी खाडीपुलावर जखमी अवस्थेत आढळली तरूणी
कोरोना रुग्णांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने एकूण सात कोविड सेंटर उभारली असून यातील व्होल्टास, बोरिवडे आणि ग्लोबल हॉस्पिटल ही तीनच कोविड सेंटर सुरू आहेत. या तिन्ही सेंटरची क्षमता १ हजार ८७५ असताना रुग्णसंख्या मात्र अवघी २५२ आहे. सोमैया यांनी तिन्ही कोविड सेंटरची आज दुपारी पाहाणी केली. याप्रसंगी सोमैया यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, भाजप गटनेते संजय वाघुले व महा पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
दौऱ्यात सोमैया यांनी ठाण्यातील कोविड सेंटरच्या घोटाळ्याचा थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावरून आपल्या पसंतीच्या कंत्राटदाराला ५२ कोटीचे कंत्राट बक्षीस म्हणून दिले असल्याचा आरोप सोमैया यांनी केला.
या आधीही केलेत आरोप
भाजप नेते किरीट सोमैया यांनी या आधीही अशा प्रकारे अनेकदा सरकारवर आरोप केले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या चौकशीदरम्यान देखील सोमैया आरोप करत होते. सोमैयांच्या आरोपांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - भिवंडीत हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; 25 ते 30 जण ताब्यात