ठाणे - महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. कामगार संघटनांनी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे. ते आज(बुधवारी) माथाडी संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बेलापूर मतदारसंघाच्या उमेदवार आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या.
कष्टकरी माथाडी कामगारांना नोकरीविषयक संरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ ला कायद्याने ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या बदलत्या परिस्थितीमध्ये कायद्यातील त्रुटी दूर करणे तसेच हा कायदा आणखी मजबूत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. माथाडी कायदा सुरक्षित राहावा, माथाडी कामगारांची कामे व्हावी म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत युतीला निवडून द्यावे, असे आवाहन माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, बळवंत पवार, दीपक रामीष्टे, प्रकाश पाटील यांनी केले. जातीच्या आधारावर मतदान मागणाऱ्या लोकांना मतदान करण्यापेक्षा कामाच्या आधारावर मतदान मागणे योग्य आहे, असे यावेळी बेलापूर मतदारसंघाच्या उमेदवार मंदा म्हात्रे म्हणाल्या.
हेही वाचा - आदिवासी आश्रम शाळांना 'गॉड्स व्हॉलेंटीयर' संस्थेचा मदतीचा हात
हेही वाचा - '10 रुपयांत जेवणाची थाळी म्हणजे, शिवसेनेची मतांसाठी फसवाफसवी'