नवी मुंबई - माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज माथाडी नेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला होता. या बंदसाठी नवी मुंबई वाशीतील पाचही बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश माथाडी नेत्यांनी दिले होते. परंतु, पहिल्यांदाच माथाडी कामगारांचा बंद अयशस्वी झाल्याचे दिसून आले.
पहाटे सर्वप्रथम सुरू होणारा वाशीतील भाजीपाला बाजार, जिथे कडकडीत बंद दरवेळी पुकारण्यात येतो, हा बाजार आज सुरळीत सुरू होता. बंदचा कोणताही परिणाम घाऊक भाजीपाला बाजारावर पहायला मिळाला नसून हा बंद अयशस्वी ठरण्यामागे माथाडी नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांच्यात निर्माण झालेली दरी असल्याचे समोर येत आहे. या नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे हा संप अयशस्वी ठरला आहे.
हेही वाचा - राज्यातील शाळांमध्ये आता मराठी विषय अनिवार्य
दरवेळी माथाडी कामगारांच्या आंदोलनात व्यापारी देखील साथ देतात. यावेळी हे चित्र वेगळे असून व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला नाही व एवढ्या कमी नोटीसवर बाजार बंद ठेवण अशक्य असून, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने बाजार बंद ठेवला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथाडी कामगारांच्या संघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आजच्या बंदवरून माथाडी संघटनेमध्ये नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे अशी दुफळी निर्माण झाल्याने बंद फिस्कटल्याचे बोलले जात आहे. यावर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी संघटनेत फूट पडली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माथाडी संपामुळे भाजीपाला बाजार बंद नसला तरी फळे, मसाले, कांदा-बटाटा व दाणा बाजार या चारही बाजारांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. फळबाजारातील काही व्यापाऱ्यांनी छुप्या पद्धतीने कामकाज सुरू ठेवले होते. अशा व्यापाऱ्यांना दमदाटी करून माथाडी संघटनेमार्फत सर्व व्यापार बंद करण्यात आले.
हेही वाचा - याच अधिवेशनात 'दिशा' कायदा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची सभागृहात माहिती