ठाणे - भिवंडीत अग्नीतांडवाचे सत्र सुरूच आहे. आज दुपारच्या सुमारास गोदाम पट्ट्यातील पूर्णा गावात असलेल्या सिमला कंपाऊंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे.
गोदामात विविध प्रकारच्या केमिकल साठा
भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावात असलेल्या सिमला कंपाउंड येथे विनोद तिवारी यांचे केमिकल गोदाम आहे. या गोदामात अमोनियम क्लोराइड, कॅल्शियम कार्बोनेट, पीव्हीसी पावडर, स्टोनिक अॅसिड, हायड्रोजन अशा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल साठवून ठेवले होते. आज दुपारी अचानक या केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या केमिकल गोदामाच्या बाजूला केमिकलच्या इतरही अनेक गोदामे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर फोमच्या साहाय्याने अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या याठिकाणी कुलिंगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस व महसूल प्रशासनचे बेकायदा केमिकल गोदामांवर दुर्लक्ष
भिवंडीतील ग्रामीण व शहरी भागात असलेल्या रहिवासी ठिकाणी केमिकल साठविण्यास बंदी असतानाही केमिकल मालक अवैध पद्धतीने केमिकलची साठवणूक करत असल्याने या केमिकल गोदामांना आग लागल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र स्थानिक पोलीस व महसूल प्रशासन या केमिकल गोदामांवर कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.