ठाणे - उल्हासनगर शहरातील शांतीनगर परीसरात असलेल्या खासगी कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागातील वातानकुलीत यंत्राचा भीषण स्फोट होऊन, आग लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या रुग्णालयात सध्या 10 ते 15 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात स्फोट झाल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अतिदक्षता विभागातील साहित्य आणि मशनरी जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.
वातानकुलीत यंत्राचा झाला जोरदार स्फोट
उल्हासनगर मधील शांतीनगर परिसरात मॅक्सिलाईफ या नावाने खासगी कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात रविवारी रात्रीच्या सुमारास अतिदक्षता विभागात असलेल्या वातानुकूलित यंत्रात भीषण स्फोट झाला. यावेळी अतिदक्षता विभागात कोरोना आजाराने गंभीर असलेले काही रुग्ण उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते. या स्फोटाची घटना घडताच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात धुराचे लोट पसरल्याने रुग्णालयामध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, उल्हासनगर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र कोरोनाबाधित रुग्णांना इतर रुग्णालयात हलवताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. या रुग्णांना पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने इतर रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांना आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केल्याने, काहीकाळ गोंधळ उडाला होता.