ठाणे - कुटुंबामधील क्षुल्लक भांडणात उद्भवलेल्या हाणामारीच्या प्रसंगाला मराठी विरुद्ध गुजराती अशा वादाचे स्वरूप देत व्हायरल केलेल्या व्हिडीओने ठाण्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार नौपाड्यातील विष्णूनगर परिसरात 11 सप्टेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यानुसार पोलिसांनी दोन्ही कुटुंबाना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा - स्त्यावरील खड्ड्यामुळे संतापला पुष्कर श्रोत्री, व्हिडिओद्वारे व्यक्त केला संताप
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, असा कुठलाही जातीय वाद उद्भवला नसल्याचे स्पष्ट केले. तर दोन समाजात दुही निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे मनसेने शाह याचा शोध घेत त्याला माफी मागण्यास भाग पाडले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार संजय लीला भन्साळी
नौपाड्यातील विष्णूनगर हा मराठी भाषिक ब्राह्मणबहुल परिसर आहे. येथील सुयश सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहुल पैठणकर हे मराठी भाषिक आणि सहाव्या मजल्यावर हसमुख शाह हे गुजराथी भाषिक कुटुंबासह वास्तव्य करतात. 11 सप्टेंबर रोजी राहुल यांच्या आईची चप्पल लिफ्टमध्ये अडकल्याने लिफ्ट अडकली होती. तेव्हा,वरच्या मजल्यावरील शाह कुटुंबीयांनी याबाबतची विचारपूस राहुल यांच्याशी केली असता दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचे पर्यावसान भांडण व शिवीगाळीत होऊन दोन्ही कुटुंबीयांची एकमेकास हाणामारी करण्यापर्यंत मजल गेली.
हेही वाचा - भिडेंसह इतर आरोपींच्या विरोधात ११ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा - मुंबई उच्च न्यायालय
दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची उणीदुणी काढली. तथापि, शाह पिता-पुत्रांनी राहुल यांना मारहाण केल्याची सीसीटीव्ही चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल केली. तर काही जणांनी या वादाला मराठी विरुद्ध गुजराथी भाषिक वादाची फोडणी दिली. या व्हायरल चित्रफितीमुळे ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले. दोन्ही कुटुंबातील हा वाद नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनीही दोघांच्या तक्रारी नोंदवून घेत दोन्ही कुटुंबाना नोटीस बजावली असून या वादावर पडदा पडला आहे. तरीही, सोशल मीडियात व्हायरल झालेल्या चित्रणाने पोलिसांच्या डोक्याचा ताप नाहक वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा - सत्ता आल्यास आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ करणार - विजय वडेट्टीवार
मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शाह याचा शोध घेत त्यांना मनसेच्या स्टाईलने माफी मागण्यास भाग पाडले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला व्हिडिओ समोर कोणाला शिवीगाळ व मारहाण करू नये, असे आदेश दिल्याने मी याला कॅमेरासमोर आता माफी मागायला सांगितली आहे. मात्र, त्याला नंतर मनसे स्टाईलने चोप देणार असल्याचा व्हिडिओ तयार करत तो आता सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या डोक्याच्या ताप वाढला आहे. तर दुसरीकडे मराठी आणि गुजराती वाद आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.