ठाणे Maratha Reservation Issue : मागील अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरुद्ध पुन्हा एकदा एल्गार केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याला मुख्यमंत्र्याच्या ठाण्यापासून सुरुवात झालीये. ठाण्यातील सकल मराठा समाजाकडून 28 ऑक्टाेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या साखळी उपोषणासाठी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानाबाहेरच्या जागेची मागणी केली होती, परंतु पोलिसांनी त्यांच्या या मागणीला विरोध करत परवानगी नाकारली आहे. त्यामुळं आंदोलक संतप्त झालेत.
आंदोलकांना 149 ची बजावली नोटीस : 28 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या उपोषणाला परवानगी नाकारत पोलिसांनी कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस देखील बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतर देखील साखळी उपोषण आंदोलनावर सकल मराठा समाज ठाम असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळपासून आंदोलन सुरू करणार असल्याचं सांगितलंय. तसंच पोलिसांच्या कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत संवैधानिक पद्धतीनं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय.
...तर होणार कारवाई : 31 ऑक्टोबरपर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त आंदोलकांना एकत्र येत घोषणाबाजी किंवा आंदोलन करण्यास मनाई आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलनाला मनाई आहे. तसंच या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आलाय.
हेही वाचा -
Manoj Jarange On PM : मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदींचं मौन; मनोज जरांगे पाटील म्हणाले...