ठाणे: उन्हाळा आल्यानंतर सर्वांत पहिली चाहूल लागते ती म्हणजे आंब्याची. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारात आंब्यांची आवक सुरू होते. आंब्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. त्यात हापूस, पायरी, लंगडा, केसरी या सर्व प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात होते. कारण, उन्हाळ्यामध्ये आलेले आंबे चांगल्या प्रतीचे मानले जातात.
आंब्याचे दर चढेच: मागील अनेक वर्षांपासून आंब्यांच्या भावांमध्ये कुठलीही घट झालेली नाही. उलट सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळतेय. यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या वृक्षांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादन कमी झाले असल्याचे व्यावसायिक सांगतात. बाजारात आलेला केशरी आंबा, पायरी आंबा, देवगड, हापूस या सर्व आंब्यांना बाजारात मोठी मागणी आहे. तर बाजारात योग्य प्रतीचे आंबे येत नसल्याचे देखील व्यावसायिक सांगत आहेत.
असा असतो विक्रीचा दर: सर्वसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आंबे बाजारात विक्रीसाठी येत असतात. त्यावेळी दर सर्वांत जास्त असतो. तो दर मार्च, एप्रिलमध्ये कमी होतो. आवक जसजशी वाढते तशी किंमत कमी होते; मात्र यंदा उलट स्थिती आहे. वधारलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना आंबा घेणे परवडत नाही. आता पावसाळा सुरू झाल्यावरच किंमत कमी होण्याची आशा ग्राहक वक्त करत आहेत. जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना आंबा घेणे परवडू शकेल.
अवकाळी पाऊस कारणीभूत: महाराष्ट्रभरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळेच आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला. त्यामुळे उत्पादन कमी झाले. राज्यातील फळ बाजारांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात आंबा उपलब्ध नसल्यामुळे त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे. सहा महिन्यात अनेकदा पाऊस पडल्यामुळे राज्यभरातील आंब्याचे उत्पादन घटले असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
मुंबईकरांना स्वस्त आंब्याची प्रतीक्षा: नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात फळांचा राजा असलेल्या आंब्याची आवक काही प्रमाणात वाढली असून रोज १२ ते १३ हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि अति थंडीमुळे आंबे गळून पडल्याने आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. आता काही प्रमाणात आवक वाढली असली तरी आंब्याचे ठोक दर पेटीमागे २ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंत आहेत. २० एप्रिलनंतर आंब्याची आवक वाढण्याची शक्यता वर्तविली गेली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून पुढील महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती एपीएमसी फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! शाळा बंद मात्र अनुदान सुरू, शिक्षण विभागाला भनकसुद्धा नाही