ठाणे - मित्राचे झालेले भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात ही घटना घडली आहे. राजू पाटील, असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का? - गँगस्टर एजाज लकडावालाला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागातील गोसावीपुरा येथे मृत राजू पाटील राहत होता. याच परिसरात राहणारे आरोपी शंभू यादव, अभिनंदन यादव आणि रक्षाराम यादव यांच्याशी 18 जानेवारीला त्यांचा मित्र श्याम परदेशीचे भांडण झाले होते. त्यांनतर 19 जानेवारीला श्याम त्या भांडणाची समजूत काढण्यासाठी राजूला घेऊन गेला. यावेळी आरोपी शंभू, अभिनंदन आणि रक्षाराम या तिघांनी पुन्हा वाद घालत शिवीगाळ केली. तसेच शंभुप्रसाद व रक्षारामने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अभिनंदनने लोखंडी वस्तूने राजूच्या डोक्यात वार केला. यामध्ये राजू गंभीर जखमी झाला. त्याला कल्याण पूर्वेतील मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हे वाचलं का? - मोखाडा येथे अवैध दारू जप्त, 31 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मृताचा मित्र श्याम परदेशी याने केलेल्या तक्रारीनुसार खूनाचा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच उद्या तिघांनाही न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.